झारगडवाडी ग्रामपंचायतला पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी देण्याची मागणी..
"आओ जाओ घर तुम्हारा" वागणाऱ्या आणि मनमानी कारभार करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा..
पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी न दिल्यास १८ डिसेंबर पासून पंचायत समिती समोर आमरण उपोषण करणार.. सामाजिक कार्यकर्ते युवराज पोटे..
झारगडवाडी : झारगडवाडी ग्रामपंचायत ही मोठी ग्रामपंचायत आहे, या गावाला पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी असणे गरजेचे आहे. मात्र या गावाला बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल बागल यांच्याकडून पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी दिला जात नाही यामुळे गावचा विकास थांबला आहे. झारगडवाडी गावाला पूर्ण वेळ ग्रामविकास अधिकारी तात्काळ द्यावा अन्यथा १८ डिसेंबर पासून बारामती पंचायत समिती समोर आमरण उपोषण करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते युवराज पोटे यांनी सांगितले आहे. यासाठी बारामतीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी पत्र व्यवहार देखील करण्यात आला आहे.
झारगडवाडी गावाला सध्या मेखळी गावातील असलेले ग्रामविकास अधिकारी संजय साळुंखे यांच्याकडे झारगडवाडी चा अतिरिक्त चार्ज देण्यात आला आहे. मात्र हे महाशय "आओ जाओ घर तुम्हारा" अशा मनमानी पद्धतीने वागत आहेत. यांना झारगडवाडी गावाला कुठल्या वारी असणार आहे आणि वेळ काय आहे असा बोर्ड लावण्याची अनेक वेळा मागणी करूनही हे महाशय जाणीवपूर्वक बोर्ड लावत नाहीत. हे ग्रामविकास अधिकारी एक दोन दिवस येतात तेही दोन तीन तास थांबून निघून जातात यामुळे गावातील अनेक नागरिकांना वार आणि वेळेची माहिती मिळत नसल्याने वारंवार चकरा माराव्या लागत आहेत तसेच मनमानी कारभार करत असल्याचा आरोप देखील त्यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते युवराज पोटे यांनी केला आहे.
उपोषण कर्त्याच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे.. पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी मिळावा, याचबरोबर गावातील मिळकत क्रमांक ४३६ मध्ये बेकायदेशीर अतिक्रमण करून उभा केलेला टॉवर तात्काळ काढून टाकण्यात यावा, गणेश नगर मधील सार्वजनिक व्यायाम शाळेच्या चहूबाजूने झालेले अतिक्रमण तात्काळ निष्कासित करून तेथील व्यायाम शाळा वापरासाठी खुली करण्यात यावी, विकास कामातून बांधण्यात आलेले आपले सेवा केंद्र तात्काळ चालू करावे, ग्रामपंचायत मालकीच्या मालमत्तेच्या नोंद नसणाऱ्या सर्व मालमत्ता यांची पाहणी करून तात्काळ नोंदी करण्यात याव्यात, जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय उपविभागीय अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्राच्या अनुषंगाने तात्काळ अहवाल सादर करावा, तसेच कार्यवाहीबाबत जाणीवपूर्वक विलंब लावणाऱ्या सर्व जबाबदार व कर्तव्य असणाऱ्या प्रशासकीय अधिकारी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्यानुसार व नियमानुसार कार्यवाही करावी अशा प्रमुख मागण्या सामाजिक कार्यकर्ते युवराज पोटे यांच्याकडून करण्यात आल्या आहेत या मागण्या पूर्ण न झाल्यास १८ डिसेंबर २३ पासून बारामती पंचायत समिती समोर आमरण उपोषण करणार असल्याचे पोटे यांनी सांगितले आहे.
अजित बोरकर ( सरपंच ) - झारगडवाडी गाव मोठे आहे यामुळे या गावाला पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी असणे गरजेचे आहे. याबाबत गावच्या वतीने आम्ही बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल बागल यांच्याशी पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी देण्याची मागणी केलेली आहे. सध्या गावाला अतिरिक्त पदावर असलेले ग्रामविकास अधिकारी संजय साळुंखे हे एक दोन दिवस येतात आणि तेही दोन-तीन तासच थांबत आहेत यामुळे गावाच्या विकासाला गती मिळत नाही यामुळे गटविकास अधिकारी यांनी आमच्या गावाला पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी तात्काळ द्यावा. याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देखील निवेदन देणार असल्याचे सरपंच अजित बोरकर यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा