बारामती बाजार समितीत ज्वारीला मिळाला उच्चांकी दर..
स्वच्छ आणि दाणेदार ज्वारीला प्रतिक्विटला मिळाला ६०५१ दर..
बारामती : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी झालेल्या लिलावामध्ये ज्वारीला राज्यात उच्चांकी दर मिळाला आहे. स्वच्छ आणि दाणेदार ज्वारीला प्रतिक्विटला ६०५१ रुपये असा उच्चांकी दर मिळाला आहे. दानवलेवाडी (ता. माण) येथील शेतकरी हनुमंत तरटे यांच्या ज्वारीला हा उच्चांकी दर मिळाला. ज्वारी बरोबर इतर कडधान्याला देखील चांगला भाव या बारामती बाजार समितीमध्ये मिळत आहे. ज्वारीची आवक कमी असल्याने जादा दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल या बाजार समितीत आणावा असे आव्हान सभापती सुनील पवार उपसभापती निलेश लडकत यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
बारामती बाजार भाव पुढील प्रमाणे...
चांगल्या दर्जाच्या गव्हाला ३००० रुपये, मकेला प्रतिक्विंटल २१७१ रुपये, बाजरी प्रतिक्विंटल २५०१ रुपये, हरभरा ४७८१ रुपये, तुर ९०११ रुपये, उडीद ८१४० रुपये आणि खपलीसाठी २५२० रुपये प्रतिक्विंटल..
खरेदीदार म्हणून आवारातील बाळासो फराटे, महावीर वडुजकर, मिलिंद सालपे, शशिकांत सालपे, जगदिश गुगळे, दीपक मचाले, अशोक भळगट, सतीश गावडे यांनी सहभाग घेतला. ज्वारीची आवक माण, दहिवडी या तालुक्यांतून होत आहे. बारामतीसह इंदापूर, दौंड, फलटण या तालुक्यांतून अन्य शेतमालाची आवक होत आहे. मुख्य बाजार आवारात ग्रेडिंग मशिन असल्याने शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. यासाठी आणखी एक नवीन मशिन बसवणार आहे. परिणामी शेतमाल कमी वेळेत जादा स्वच्छ होईल व त्याचा आर्थिक फायदा शेतकऱ्यांना होईल, असेही सांगण्यात आले. समितीने आवारात शेतमाल आल्यानंतर प्रथम वजन नंतर लिलाव अशी सुविधा दिल्याने शेतकऱ्यांना लगेच पेमेंट मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल बारामती बाजार आवारातच विक्रीस आणावा, असे आवाहन सचिव अरविंद जगताप यांनी केले आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा