शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवलीच ! सुप्रिया सुळे यांच्यासोबत 'या' नेत्याला बनवलं कार्यकारी अध्यक्ष..
सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल नवे कार्यकारी अध्यक्ष..
शरद पवार यांची दिल्लीत मोठी घोषणा..
महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा या राज्यातील निवडणुकांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे..
अजित पवार यांच्याकडे कुठलीही जबाबदारी नाही..
अजित पवार नाराज असल्याची चर्चा..
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या अध्यक्ष पदाबाबाबत अखेर भाकरी फिरवली आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामुळे पक्षातील पवारांचे उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळेंसोबत प्रफुल्ल पटेल यांचं नाव निश्चित झालं आहे.
राष्ट्रवादीच्या स्थापनेच्या आधीपासूनच प्रफुल पटेल शरद पवारांच्या सोबत आहेत. त्यामुळे पवार कुटुंबाबाहेरील राष्ट्रवादीचा सर्वोच्च नेता म्हणूनही पटेल यांना ओळखलं जातं. आज राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा होत असताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकारी अध्यक्षांची घोषणा केली. यामध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची वर्णी लागली. शरद पवारांनी जेव्हा काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा पवारांसोबत पटेल यांनीही काँग्रेसला रामराम ठोकला होता. मात्र, पटेल हे त्यापूर्वीपासूनच पवारांसोबत राहिले आहेत.
शरद पवारांनी याबाबत घोषणा केल्यानंतर पटेलांनी माध्यमांशी संवाद साधला. "सुरुवातीपासून मी राष्ट्रीय पातळीवर काम करत आलो आहे. मी पहिल्यापासून राष्ट्रवादीची जबाबदारी सांभाळत आलो आहे. शरद पवारांनी दिलेली कोणतीही जबाबदारी आजपर्यंत मी पार पाडत आलो, यापुढेही पार पाडणार आहे." अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा